पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये भर पावसात आणि गर्दीचा फायदा घेत नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या सराईत चोरट्यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे चोरी करून पळ काढल्यानंतर हे चोर एका ठिकाणी बसून लुटलेल्या पैशांची वाटणी करत होते. मात्र, त्यांची ही योजना फार काळ टिकली नाही. गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अचूक माहितीच्या आधारे सापळा रचत तिघांना रंगेहात अटक केली आणि अवघ्या ४८ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला.

दोन दिवसांपूर्वी दापोडी परिसरात एका नागरिकाची दोन लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती. मुसळधार पाऊस आणि परिसरातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अत्यंत शिताफीने ही चोरी केली होती. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकही या चोरट्यांचा शोध घेत होते.

तपासादरम्यान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, चोरी केलेली रक्कम आपापसात वाटून घेण्यासाठी संबंधित आरोपी एका ठिकाणी जमणार आहेत. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, सहाय्यक उपनिरीक्षक प्रमोद वेताळ आणि महादेव जावळे यांच्या पथकाने सापळा रचला. आरोपी पैशांची वाटणी करत असतानाच पोलिसांनी अचानक धाड टाकत त्यांना कोणतीही संधी न देता ताब्यात घेतले.
या कारवाईत योगेश गणेश माने (४४), मनोहर रमेश माने (४०) आणि शंकर सिद्राम गायकवाड (४८, रा. मुंढवा, पुणे) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून चोरीची संपूर्ण दोन लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे भर पावसात आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. दुसरीकडे, अवघ्या दोन दिवसांत चोरीचा उलगडा करून आरोपींना अटक करण्यात आल्याने दापोडी परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारी टोळ्यांवर प्रभावी कारवाई करण्याचा पोलिसांचा निर्धारही स्पष्ट झाला आहे.







