पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील औंध-रावेत बीआरटीएस मार्गावरील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा रक्षक चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण होण्यापूर्वीच हा पूल नागरिकांसाठी सुरू करण्यात आल्याने अनेक महिन्यांपासून वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
औंध ते रावेत बीआरटीएस मार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे या उड्डाणपुलाची मागणी सातत्याने होत होती. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी प्रशासनाने शुक्रवारी रात्री हा पूल तात्पुरता वापरासाठी खुला केला.
मात्र, उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर काही समस्या समोर आल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान काही ठिकाणी सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबर्सना नुकसान झाले असून, त्यात माती आणि मुरूम गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या चेंबर्सची स्वच्छता आणि दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
तसेच उड्डाणपुलाच्या कामादरम्यान काही भागातील पदपथ हटवण्यात आल्याने पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पदपथ पूर्ववत करण्याची मागणीही स्थानिकांकडून होत आहे.
दरम्यान, पूल सुरू झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत दोन अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका घटनेत चारचाकी वाहन उलटले, तर दुसऱ्या अपघातात दुचाकी आणि चारचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलावरील तांत्रिक बाबींची तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.
महापालिकेने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उड्डाणपूल तात्पुरता खुला केल्याचे सांगितले असून, उर्वरित कामे सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.






