मुंबई: ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड महामार्गाजवळील म्हारळ परिसरात एका तरुणाच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. छेडछाडीच्या प्रकरणात पीडित मुलीला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या झाल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

मृत तरुणाचे नाव रवींद्र अहिरे (वय 30) असे आहे. ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास म्हारळ येथील मलखान कंपाऊंड परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी दीपक डांगे याच्यावर परिसरातील एका मुलीची छेडछाड केल्याचा आरोप होता. या प्रकरणात रवींद्र अहिरे यांनी संबंधित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. याच कारणावरून आरोपी संतापल्याचे सांगितले जात आहे.
त्यानंतर रवींद्र अहिरे हे घराबाहेर असताना आरोपी दीपक डांगे आणि त्याचे साथीदार विजय भिडे व परशुराम भिडे यांनी त्यांना अडवून धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत अवघ्या एका तासात दीपक डांगे, विजय भिडे आणि परशुराम भिडे या तिघांना अटक केली. या घटनेमुळे म्हारळ परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







