पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेत नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे दुःख ताजे असतानाच गायकवाड कुटुंबावर आणखी एक आघात झाला आहे. नागेश यांच्या पत्नी सोनाली गायकवाड (वय २८) यांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सोनाली यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. सोनाली यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत भोसरी एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेत पती नागेश यांचा मृत्यू झाल्यानंतर सोनाली यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींकडून त्यांचा मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पतीच्या मृत्यूनंतर प्रशासनाकडून मिळालेल्या आर्थिक मदतीवरून सासरच्या मंडळींकडून सोनाली यांच्याशी वारंवार वाद घातला जात होता. तसेच पतीच्या निधनानंतर त्यांना सातत्याने टोमणे मारले जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सोनाली यांना दोन मुली असल्याने त्यावरूनही सासरच्या मंडळींकडून त्यांचा मानसिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळून सोनाली यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत पतीला गमावल्यानंतर काही काळातच सोनाली यांच्या आत्महत्येने गायकवाड कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.







