पुणे: हिंजवडी आयटी पार्क आणि आसपासच्या 7 गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे गेल्या सुमारे 10 वर्षांपासून रखडलेल्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला आता पुन्हा चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर आयटी कंपन्या आणि नागरिकांची वस्ती वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, पथदिवे आणि वाहतूक यांसारख्या सुविधांचा पुरेसा विकास झालेला नाही. सध्या या भागातील कारभार विविध यंत्रणांमध्ये विभागला असल्याने जबाबदारी निश्चित करण्यात अडचणी येतात. त्याचा थेट परिणाम नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांवर होत आहे.

हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे आणि गहुंजे या गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने 10 फेब्रुवारी 2015 रोजी याबाबत निर्णय घेतला होता. त्यानंतर 3 जून 2015 रोजी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र, विविध प्रशासकीय प्रक्रियांमुळे त्यावर अंतिम निर्णय झाला नाही.

दरम्यान, या गावांमध्ये झपाट्याने बांधकामे वाढली आहेत. अनियोजित विकासामुळे अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, कचरा आणि ड्रेनेजच्या समस्या गंभीर होत आहेत. त्यामुळे या परिसरासाठी एकसंध प्रशासनाची गरज असल्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
महापालिकेत समावेश झाल्यास सुमारे 56.72 चौरस किलोमीटर क्षेत्र वाढणार आहे. मात्र, हिंजवडी, माण आणि मारुंजीतील काही नागरिकांनी महापालिकेत जाण्यास विरोध केला आहे. स्वतंत्र नगरपरिषद किंवा स्वतंत्र महानगरपालिका करण्याची मागणीही करण्यात आली आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सरकार प्रत्यक्ष निर्णय कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







