Pune Crime : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-1 ने शहरात दरोडे टाकण्यासाठी नाशिक (Nashik) जिल्ह्यातून आलेल्या दोन तरुणांना अटक (Arrest) केली आहे. या दोघांनी संत तुकाराम नगर आणि चिखली परिसरात महिलांकडून सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याचे तपासात उघड झाले आहे. गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. Pune Crime

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अक्षय सुनील बोरकर (वय 21, रा. नाशिक) आणि प्रशांत संतविजय यादव (वय 19, रा. गंगापूर, नाशिक) अशी आहेत. या दोघांविरोधात महिलांकडील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे शाखा युनिट-1 ने या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू केला होता.
पोलिस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळांपासून सुरू होणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संशयितांचा मार्ग शोधण्यास सुरुवात केली. पोलिस कॉन्स्टेबल महादेव जावळे आणि त्यांच्या पथकाने सुमारे 500 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासात आरोपी पकड टाळण्यासाठी वारंवार आपले मार्ग बदलत असल्याचे दिसून आले.
तांत्रिक तपासानंतर आरोपी नाशिक जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने नाशिकमध्ये जाऊन दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात दोन ठिकाणी दरोडे टाकल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 340000 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
तपासात हेही निष्पन्न झाले आहे की, हे दोघे सराईत गुन्हेगार असून नाशिक जिल्ह्यात त्यांच्याविरोधात चेन स्नॅचिंग आणि मालमत्तेशी संबंधित 25 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय गुलिग, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, महादेव जावळे, जयवंत राऊत आणि त्यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.







