पिंपरी- चिंचवड: वाकड (Pimpri-Chinchwad) परिसरातील नागरिकांसाठी आरक्षित असलेला महत्त्वाचा भूखंड पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने बिल्डरांना दिल्याचा गंभीर आरोप होत आहे. या निर्णयामुळे संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

वाकड भागातील नागरिक कित्येक वर्षांपासून PMRDA कडे या भूखंडाची मागणी करत आहेत. नागरिकांची मागणी आहे की, हा भूखंड उद्यान, खेळाचे मैदान आणि विरंगुळा केंद्र यासारख्या सार्वजनिक सुविधांसाठी राखीव ठेवण्यात यावा. महत्त्वाचे म्हणजे, सुमारे 1 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच भूखंडावर सार्वजनिक सुविधा दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते.
नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून, PMRDA प्रशासनाने पेठ क्रमांक 39 मधील भूखंड दोन बांधकाम व्यावसायिकांना दिला आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
या निषेधार्थ, स्थानिक नागरिकांनी 30 नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. या भूखंडाची विक्री त्वरित स्थगित करावी आणि हा भूखंड नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी पुन्हा राखीव ठेवावा, अशी प्रमुख मागणी आंदोलक नागरिकांनी केली आहे.







