अमित मुंडिक

Pimpari Chinchwad Crime: शहरात वाढत्या घरफोड्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या विशेष आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 1 ने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. पथकाने एका सराईत घरफोड्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून सुमारे सात लाख रुपये किमतीचे सहा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. (pune latest crime news)
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच युनिट 1 चे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पेट्रोलिंगदरम्यान संशयित जेरबंद
पेट्रोलिंग करत असताना दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी व पोलीस हवालदार देवा राऊत यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम निगडी प्राधिकरण परिसरात चोरीचे दागिने विक्रीसाठी घेऊन येणार आहे. या अनुषंगाने तत्काळ सापळा रचण्यात आला आणि संशयित धनंजय हरीष काळे (वय 29, रा. पिंपळे गुरव) याला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आले.
घरफोड्यांच्या मालिकेची कबुली (pune crime)
सखोल चौकशीत धनंजय काळे आणि त्याचे साथीदार चंद्रकांत अनंता माने (रा. अजंठानगर) व सुनील मल्हारी तलवारे (रा. काळेवाडी) यांनी पिंपळे गुरव येथील प्रभातनगर, ओटा स्कीम, भिमशक्तीनगर तसेच निगडी परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली. सांगवी पोलीस ठाण्याचा गुन्हा क्र. 458/2025 (बीएनएस कलम 331(3), 305(ए)) आणि निगडी पोलीस ठाण्याचा गुन्हा क्र. 584/2025 (बीएनएस कलम 331(3), 305) उघडकीस आला आहे.
प्राथमिक तपासात आरोपींचा गुन्हेगारी इतिहास मोठा असून पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि राज्यातील विविध ठिकाणी 50 ते 60 घरफोड्या केल्याचा खुलासा झाला आहे. जास्त दिवसांपासून बंद असणाऱ्या घरांवर हे टोळीचे सदस्य विशेष लक्ष ठेवत असल्याचे समोर आले.
दरम्यान, अटक केलेल्या आरोपींकडून सोन्याचे गंठन, चेन व अंगठ्या असे एकूण सात लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. इतर गुन्ह्यांचा तपास सुरू असून पुढील कार्यवाही सांगवी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर आणि अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, शिवानंद स्वामी, संतोष इंगळे, दिलीप चौधरी, शिवराम भोपे, देवा राऊत, दीपक तांदळे, विजय जानराव, केशव चेपटे व सोहेल चिखलकर यांनी केली.






