पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर रील्स आणि व्हिडिओ बनविणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गणेश विसर्जनानंतर तलाव, नदी, खाडी किंवा हौदांमध्ये असलेल्या विसर्जित गणेशमूर्तींचे फोटो अथवा व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर किंवा प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बंदी घातली आहे. हा आदेश १४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत लागू राहणार आहे.

गणेश विसर्जनानंतर काही नागरिक विसर्जित मूर्तींचे चित्रीकरण करून ते व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. अशा प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याची तसेच गैरसमज निर्माण होऊन सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याच पार्श्वभूमीवर पोलीस सहआयुक्त डॉ. शंतनू महावरकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे. आदेशाचे उल्लंघन करून विसर्जित गणेशमूर्तींचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडिया अथवा प्रसारमाध्यमांवर प्रसारित केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

विसर्जनानंतर तलाव, नदी, खाडी आणि हौदांमधील मूर्तींचे चित्रीकरण करून ते प्रसारित केल्याने भाविकांच्या श्रद्धा आणि भावना दुखावू शकतात. तसेच त्यातून समाजात गैरसमज पसरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी जारी केलेल्या आदेशांचे पालन करावे आणि विसर्जित गणेशमूर्तींचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांवर प्रसारित करू नयेत, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. शंतनू महावरकर यांनी केले आहे.







