लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल रामचंद्र टिळेकर, तर उपाध्यक्षपदी प्रकाश अंकुश कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बुधवारी (ता.16) झालेल्या निवड प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी एकही विरोधी अर्ज न आल्याने त्यांची सर्वानुमते निवड झाली.

पतसंस्थेचे मावळते अध्यक्ष हरिभाऊ कदम आणि उपाध्यक्ष स्वाती काळभोर यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी अनिल टिळेकर आणि उपाध्यक्षपदी प्रकाश कांबळे यांच्या नावावर संचालक मंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केले. यावेळी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत खैरे, अशोक कदम, आशा खैरे, सोमनाथ गुजर, ज्ञानेश्वर काळभोर तसेच व्यवस्थापक मारुती सातव आदी उपस्थित होते.

1992 पासून ग्रामीण भागातील सभासदांना आधार

ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय कल्याण (अण्णा) गुजर यांनी सन 1992 मध्ये अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. पतसंस्थेचा कारभार सुरळीतपणे चालविण्यासाठी स्वर्गीय ॲड. पी. पी. काळभोर यांनी मोलाची साथ दिली. सभासदांना तुलनेने अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देणे हे पतसंस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. सध्या संस्थेकडे सभासदांच्या 2 कोटी 20 लाख रुपयांच्या ठेवी असून, त्यापैकी 1 कोटी 91 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. संस्थेचे 17 लाख 70 हजार रुपये भागभांडवल असून, 57 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. पतसंस्थेची वार्षिक उलाढाल 7 कोटी 50 लाख रुपये असल्याची माहिती देण्यात आली.
पारदर्शक कारभाराला प्राधान्य
नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल टिळेकर यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना सांगितले की, “आगामी काळात पतसंस्थेचा कारभार पारदर्शकपणे करण्यास प्राधान्य दिले जाईल. संचालक मंडळ आणि सर्व सभासदांना सोबत घेऊन पतसंस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आर्थिक सुविधा देण्यासाठीही प्रयत्नशील राहू.”






