पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडजवळील ताथवडे परिसरात एका दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ३५ वर्षीय कल्पना सूर्यवंशी आणि त्यांची २ मुले, १५ वर्षांची मुलगी सुभश्री व १० वर्षांचा मुलगा दादू, यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे कुटुंब ताथवडे येथे भाड्याने राहत होते. आर्थिक विवंचनेतून या मातेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोमवारी सकाळपासून हे घर उघडले गेले नव्हते. कल्पना यांची बहीण त्यांना भेटायला आली असता, आतून कोणीच दार उघडतं नव्हतं. तिने शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला, तेव्हा तिघेही बेडवर निपचित पडलेले दिसले. त्यांना तातडीने पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कल्पना यांनी सोमवारी सकाळी नाश्त्याला इडली-सांबर बनवले होते. याच अन्नातून मुलांना विष दिल्यानंतर त्यांनी स्वतः विष प्राशन केल्याचा संशय आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
या घटनेमागील मुख्य कारण आर्थिक तणाव असल्याचे समोर येत आहे. कल्पना यांनी घरासाठी कर्ज काढले होते, मात्र हप्ते भरण्यास त्यांना अडचण येत होती. काही दिवसांपूर्वीच बँकेने त्यांना घराचा लिलाव करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या कायदेशीर नोटीसमुळे कल्पना मानसिक दबावाखाली होत्या आणि त्यातूनच त्यांनी हे दुर्दैवी कृत्य केले असावे, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.







