पिंपरी-चिंचवड : हिवाळ्याची चाहूल लागताच पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता खालावू लागली आहे. गेल्या आठवड्यात शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) २१९ पर्यंत पोहोचला आहे. हवेत सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शहरातील हवेतील पीएम २.५ चे प्रमाण १४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर, तर पीएम १० चे प्रमाण १८२ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपर्यंत पोहोचले आहे. रासायनिक प्रदूषकांच्या तुलनेत हवेत वाढलेले धूलिकणांचे प्रमाण अधिक चिंताजनक ठरत आहे.
वाढत्या वायुप्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांवर होण्याची शक्यता आहे. खोकला, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दमा आणि सीओपीडीसारख्या श्वसनविकारांच्या तक्रारी वाढत असल्याचे चित्र आहे.

दिवाळीपासून श्वसनाच्या तक्रारी घेऊन रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच हवेची गुणवत्ता खालावल्याने शहरातील वायुप्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.






