पुणे : ‘कॅफे पीटर’चे मालक असल्याचा दावा करून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तीन गुंतवणूकदारांची तब्बल ११ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप दाम्पत्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणातील पसार आरोपी श्वेता सचिन साळुंखे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. कंपनीच्या खात्यातून पाच कोटी रुपये आरोपीच्या वैयक्तिक बँक खात्यात हस्तांतरित झाल्याचा प्रथमदर्शनी आरोप गंभीर असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच आरोपीची पोलीस कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

पिंपळे निलख-विशालनगर येथील सचिन चंद्रकांत साळुंखे (वय ३७) आणि श्वेता सचिन साळुंखे (वय ३५) या दाम्पत्याविरोधात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूगाव येथील दीपक दत्तात्रेय बर्गे (वय ४०) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाकड येथील व्हाइट स्क्वेअरमधील कार्यालयात २२ मे २०२२ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपींनी ‘ग्लोबल फूडवर्क’, ‘ब्लॅक हॅट सिंडिकस’, ‘सुपर गॅलेक्सी स्पोर्ट्स’ आणि ‘ऑटोमॅक्स टेकसर्व्ह’ या खासगी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.

या आमिषाला बळी पडून तक्रारदारासह अन्य दोन गुंतवणूकदारांनी मिळून ११ कोटी ६७ लाख रुपये गुंतवले. मात्र, गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता ही रक्कम वैयक्तिक बँक खात्यांमध्ये वळवून अपहार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात पसार असलेल्या श्वेता साळुंखे हिने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. सरकारी वकिलांनी या अर्जाला विरोध करताना अन्य दोन गुंतवणूकदारांचे जबाब न्यायालयात सादर केले. कोणतेही कायदेशीर व्यावसायिक कारण नसताना कंपनीच्या खात्यातून पाच कोटी रुपये आरोपीच्या वैयक्तिक बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीची पोलीस कोठडीत चौकशी होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांनी नोंदवले. प्रथमदर्शनी हा प्रकार गुन्हेगारी स्वरूपाच्या विश्वासघाताचा असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने श्वेता साळुंखेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.






