पुणे: पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील पानशेत परिसरात रविवार, १५ जून रोजी एक धक्कादायक घटना घडली असून एका आदिवासी युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरले आहे. रोहिदास काळुराम काटकर (वय २४, रा. कादवे, ता. राजगड) असे मृत युवकाचे नाव असून, घटनेनंतर मारेकरी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले होते.

रविवार रात्री आठ वाजेच्या सुमारास नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेलसमोर रोहिदास काटकर आणि त्याचा मित्र विजय पांडुरंग जाधव (मोसे, ता. राजगड) हे दोघे उभे असताना, पाच अज्ञात हल्लेखोर अचानक आले आणि कोणत्याही कारणाशिवाय त्यांनी दोघांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्लेखोराने मोठा दगड उचलून रोहिदासच्या छातीवर वार केला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर रोहिदासचा मित्र हल्ल्यात जखमी झाला आहे. वेल्हे पोलीस ठाण्यात पाच अज्ञात हल्लेखोरांविरोधात रोहिदासचा भाऊ अविनाश काटकर याने खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.







