लोणी काळभोर: पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून अवैध तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी पकडले होते. पोलिसांनी ही कारवाई लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर वस्ती परिसरात रविवारी (ता. 6) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास केली होती. या कारवाई दरम्यान, कनिष्ठ पोलिस अधिकारी व त्याच्या सहकाऱ्यांनी गुन्ह्यात मांडवली करून आरोपींकडून सुमारे दीड लाख रुपये उकळल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. यामुळे लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून ट्रॅव्हल्स मधून गुटखा येणार असून तो बोरकर वस्ती परिसरात देण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला. सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने चाललेली एक ट्रॅव्हल्स बस त्या परिसरात थांबली व तेथून दोघांनी चार पोती सामान उतरविले. त्यामुळे पोलिसांचा संशय अजून बळावला. पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील पोत्यांची झडती घेतली असता, त्यामध्ये 94 हजार 500 रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ मिळून आला.
दरम्यान, लोणी काळभोर येथील मटका किंगने कारवाई टाळण्यासाठी व पकडलेला माल परत मिळवून देण्यासाठी एका कनिष्ठ अधिकाऱ्यासोबत मध्यस्थी केली. यावेळी प्रकरण दाबण्यासाठी तीन लाखांची मागणी करण्यात आली होती. परंतु, तडजोडीअंती दीड लाख रुपये देण्याची बोली जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ ठरली. दोन्ही आरोपींनी नातेवाईक व मित्रपरिवाराकडून हातउसने करून पैसे घेतले व मटका किंगच्या मार्फत लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या एका दालनात कनिष्ठ पोलिस अधिकारी व त्याच्या बगलबच्च्यांना रक्कम दिली. कारवाई होणार नाही आणि आपला पकडलेला मालही परत मिळणार असल्याने आरोपीही खुश झाले होते.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील एका कनिष्ठ अधिकाऱ्याने दोघांनाही रविवारी सकाळी पकडल्यानंतर रात्री अकरानंतर सोडून दिले. त्यामुळे दोघांनाही वाटले आपल्यावरची कारवाई टळली आहे. मात्र दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहीता कलम २२३,२७४,२०५, अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम ३० (२) (अ), ३१ (१), २६(२) (1) २६(२) (IV) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मग कारवाई न करण्यासाठी घेतलेले पैसे गेले कोठे? असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला असून या प्रकरणाची नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. तर शाळा, महाविद्यालये, दवाखान्यासह चौकाचौकात पान टपरीवर नशेली पानांची जोरदार विक्री सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र पोलिस प्रशासन अवैध गुटखा विक्रीवर कारवाईचा बडगा उगारीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यविवरणावर संशय निर्माण झाला आहे. तर संबंधित कनिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







