केडगाव: काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावर आणि धरणक्षेत्र परीसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकर्यांना विद्युत मोटारी सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मुळा मुठा नदीवरील कोरेगाव मूळ, दहीटने, राहु, वाळकी,संगम तसेच भिमा नदीवरील विठ्ठलवाडी, सांगवी सांडस, पाटेठण, निमगाव म्हाळुंगी, कोरेगाव भिवर, वडगाव बांडे येथील बंधाऱ्यांना पाणी लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पुरामुळे नदीकाठच्या सर्वच गावांचे जनजीवन विस्कळित झाले.

शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी शेतकर्यांनी नदीकाठावर बसवलेले विद्युत पंप पाण्याखाली गेले. तसेच काहीं शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी सुरक्षित बाहेर काढलेले विद्युत पंप सकाळपर्यंत पुन्हा पाण्याखाली गेले. पाणी पातळी अजूनही वाढतच असल्याने बुधवारी (ता. २०) शेतकरी दिवसभर बुडालेले विद्युत पंप सुरक्षित ठिकाणी हलवताना दिसले. पंप पाण्यात बुडून गेल्याने शेतकर्यांना पंप व्यवस्थित करून घेण्यास पुन्हा आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. तसेच नदीकाठच्या अनेक शेतातील उभ्या पिकांमध्ये पाणी गेल्याने पिके वाहून गेली आहेत.

मान्सून पूर्व पाऊस अन् जुलै महिन्यातील सलग पाऊसामुळे दौंड तालुक्यातील 400 हून अधिक परप्रांतीय गुऱ्हाळ घरे, 200 हून अधिक विट भट्टी, हजारो कांदा वाखरी, तसेच शेतीमाल, पिके, जनावरे, घरे यांचे अतोनात नुकसान झाले होते. महसूल विभागाकडून पंचनामे देखील केले गेले. परंतु तीन महिने उलटले पुन्हा पुरजन्य परस्थिती निर्माण झाली आहे पण अद्याप शेतकरी नुकसान भरपाईच्या आश्वासनाच्या डोलत्या मनोऱ्याकडे डोळे लावून बसले आहेत.
-संतोष लव्हटे (शेतकरी)







