पुणे : पुण्यातील धानोरी येथील मुंजाबावस्ती येथे व्यावसायासंदर्भात चर्चा करण्यासाठी तरुणीला घरी बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १२ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी विमाननगर येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीने २५ फेब्रुवारीला विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून प्रविण चिजवाणी (वय-३५ रा. गोल्डकोस्ट सोसायटी, मुंजाबावस्ती, धानोरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी चिजवाणी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी प्रविण याने पीडित तरुणीला व्यावसायासंदर्भात चर्चा करण्यासाठी घरी बोलावून घेतले. पीडित मुलगी आरोपीच्या घरी चर्चा करण्यासाठी गेली होती. त्यावेळी चर्चा करत असताना आरोपीने तरुणीचा हात पकडून तिच्यासोबत अश्लील चाळे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण करीत आहेत.