पुणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य (Maharashtra Politics) संस्थांच्या निवडणुकांना वेग आला असून (Supriya Sule) काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. बारामती तालुक्यातील (Baramati News) माळेगाव बु. नगरपंचायतीच्या निवडणुकीतही अशीच वादाची घटना घडली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्ष नितीन तावरे यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे स्थानिक राजकारण तापले आहे. बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सचिन सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीतील राजकीय चर्चांना दिशा मिळाली असताना माळेगावमधील या घटनेने नवीन वाद निर्माण झाला आहे. (Breaking News)

सचिन सातव हे बारामती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष असून यापूर्वी ते नगरसेवकही राहिले आहेत. त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर बारामतीतील राजकीय वातावरण स्थिर होत असल्याचे दिसत होते. मात्र माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन तावरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे वातावरण पुन्हा ढवळून निघाले. नितीन तावरे हे माळेगाव बु. येथून निवडणूक लढवत होते. याच रागातून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या हल्ल्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला. निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून या अधिकारावरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारचे हल्ले लोकशाहीला बाधक असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. नितीन तावरे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून हल्ल्याचं कारण तपासलं जात आहे.







