युनूस तांबोळी
प्रपंचाचा गाडा चालविताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काळाचा एखादा घाव जरी कोसळला तरी जीवन उध्वस्त होऊन जाते. पतीचे निधन त्यांच्यासाठी मोठा आघात ठरला होता. मोठा मुलगा अपंग, लहान मुलाचे शिक्षण आणि मुलींच्या शिक्षण व लग्नाची जबाबदारी होतीच. एकूण सगळंच आव्हानात्मक पण त्या खचल्या नाहीत. त्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि हिंमतीच्या जोरावर आव्हान स्वीकारले आणि संकटांच्या छाताडावर पाय रोवून त्यांचा मुकाबला केला. या हिंमतवान माऊलीचे नाव आहे कविता शंकर थोरात. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जांबूत गावी राहतात. आज हॉटेल व्यवसायातून उपसलेल्या कष्टाने त्यांच्या आयुष्याला आणि कुटुंबालाही जगण्याचा नवा सूर गवसला आहे.
कुटुंबात अवघी दोन एकर शेती असल्याने शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. तेव्हा पती शंकरराव यांनी हॅाटेलचा जोड व्यवसाय सुरू केला आणि प्रपंचाच्या गाड्याला जरासं पाठबळ मिळालं. त्यातून मिळेल त्या चटणीभाकरीत थोरात कुटूंब समाधानी होतं. पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं. एक दिवस अचानक अचानक पतीचे निधन झाले अन संसाराच्या गाड्याचे चाक निखळून पडले. एकचाकी गाडा ओढणं म्हणजे मोठ्या जिकिरीचं आणि कष्टाचं काम, ते कविता ताईंनी लिलया पेललं.
मोठा मुलगा राजेंद्र अपंग असल्याने त्याची जबाबदारी मोठी होती. दुसरा मुलगा सोमनाथ व दोन मुली यांचे शिक्षण त्यातून मुलींची लग्न हे सगळे आव्हानात्मक होते. पण त्यांनी हिंमत खचू दिली नाही. मुलगा सोमनाथला मदतीला घेत पतीचा हॅाटेल व्यवसाय पुन्हा जोमानं सूरू ठेवला. ‘ग्राहकांचे समाधान हाच आमचा नफा’ हेच धोरण त्यांनी अवलंबले. मितभाषी असलेल्या सोमनाथच्या कष्टाला शाळेतून शिक्षकांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे आई व मुलाचा आत्मविश्वास वाढत गेला. आईचा आधार बनत त्याने वेळप्रसंगी किटली कपबशीही हाती घेतली.
रूचकर मिसळ बनविण्यात कविता ताईंचा हातखंडा होता, आहे. त्यामुळे त्यांच्या मिसळ व भजीला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळू लागले. सकाळी नाष्ट्यासाठी त्यांच्या साई कृपा हॅाटेल मध्ये खवय्यांची गर्दी पहावयास मिळते. खवैय्यांच्या या गर्दीतच पांडुरंग मानून त्या प्रामाणिकपणे व्यवसाय करत राहिल्या. दिवस कुणाचेच बसून राहत नाहीत. कविताताईचेही राहिले नाहीत. आज त्यांच्या कष्टाचे दिवस सरले आहेत. व्यवसाय रूळावर आलाय. दरम्यानच्या काळात मनिषा व निवेदिता या दोन्ही मुलींची लग्न पार पडली आहेत. मुलगा सोमनाथचे देखील लग्न झाले आहे. नातवंडांचं गोकुळ आता कविता ताईंच्या अंगणात नांदू लागलंय. त्यांच्या कष्टाचे दिवस सरले आहेत. मात्र आजही त्यांची मेहनत आणि धडपड सुरू आहे. त्या म्हणतात की हॅाटेलचा व्यवसाय अन्नपूर्णेसारखा आहे. त्यातून दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचे समाधान खूप काही देऊन जाते. कविताताईंच्या संघर्षाचे तत्वज्ञान ऐकताना आपल्याही डोळ्या नकळत ओलावल्याशिवाय राहत नाहीत.