इंदापूर (संतोष पवार)

Indapur : प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत श्री पळसनाथ मंदिराला करण्यात आलेल्या आकर्षक रंगरंगोटीमुळे झळाळी प्राप्त झाली आहे. मंदिरावरील कोरीव नक्षीकामात विविध रंग भरण्यात आल्याने मंदिराचे सौंदर्य खुलले आहे. उजनी धरणामुळे गावाचे पुर्नवसन झाल्यानंतर प्राचीन पळसनाथ मंदिरातील शिवलिंगाची नवीन गावठाणात नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात स्थापना करण्यात आली. यामुळे मंदिर बदलले तरी ग्रामस्थांची देवावरील श्रद्धा कायम आहे.
ग्रामदैवत पळसनाथ मंदिराचे शिखर हे आध्यात्मिकतेचे प्रतीक मानले जाते. ते आकाशाकडे झेपावणारे असल्यामुळे भक्ती, श्रद्धा आणि मोक्षाचा मार्ग दर्शवते. पळसनाथ हे नाव भगवान शिवाशी संबंधित असल्याने मंदिरात शिवलींग स्थापित आहे. शिवमंदिरांमध्ये शिखराला विशेष महत्त्व असते कारण ते कैलास पर्वताचे प्रतीक मानले जाते. अशा भव्य मंदिराचे रंगकाम हे गावकऱ्यांच्या सामूहिक सहभागातून करण्यात आले आहे. यामुळे सामाजिक आणि धार्मिक एकात्मता मजबूत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.
सन १९८६ ते १९८८ दरम्यान बांधण्यात आलेल्या या मंदिराचे शिखर हे गोपुरम शैलीचे आहे. शिखर शिंगणापूरच्या महादेव मंदिराचे शिखर बांधलेल्या, तामीळनाडू राज्यातील शिखर कारागिर एन. सन्मुख सुंदरम यांच्या टीमने सुमारे ७३ हजार रुपये मजूरी घेवून बहुमजली (टप्प्याटप्प्याने वर जाणारे) शिखर उभारले आहे. या शिखराची रचना दक्षिण भारतीय द्रविड शैलीची आहे. रंगीत शिल्पकला, शिखरावर विविध देव-देवतांच्या सुमारे १४४ मूर्ती, कोरीवकाम आणि आकर्षक रंगसंगतीमुळे मंदिर नेत्रदिपक वाटते. शिखरावर गणेश, विष्णू, देवी, शिवपरिवार अशा विविध प्रतिमा दिसतात. प्रत्येक स्तरावर लहान मंडप व मूर्ती बसवलेल्या आहेत. सर्वात वरती सुवर्ण कलश आहे. तो गावाचा समृद्धी व पूर्णत्वाचे प्रतीक मानला जातो. शिखराची उंची भक्ताला ईश्वराकडे पाहण्यास प्रेरित करते.
सध्या ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून रंगकाम केले जात आहे. यासाठी ८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत केल्याने आतापर्यंत ९ लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली आहे. यातून रंगकामाबरोबर मंदिर परिसरात बगीचा तयार केला जाणार आहे. मंदिराच्या रंगकामामुळे गावातील एकात्मता सिद्ध झाली आहे…. ठळक बाबी
* ग्रामदैवत श्री पळसनाथ मंदिर बांधणी – १९८६ – १९८८ च्या दरम्यान.
* मंदिरासाठी बारामती तालुक्यातील पणदरे येथून पाषाण दगड आणला.
* बारामतीचे प्रसिध्द वास्तुविशारद शहा यांनी मंदिराचे डिजाईन तयार केले.
* शिखरावर नाजूक कलाकुसर व आकर्षक १४४ मुर्त्यांचा समावेश.
* पळसनाथाचं कुरण (देवस्थान मालकीची जमिन) धरणात गेल्याने मिळालेल्या मोबदल्यातून मंदिराचे काम पूर्ण.
* मंदिराची उंची सुमारे ५१ फूट.
* आतापर्यंत जमा झालेली लोक वर्गणी सुमारे ९ लाख.
* रंगरंगोटीसाठी मजूरी – २ लाख.
* रंग खरेदी – ६ लाखांपर्यंत.
* मंदिर परिसरात बगीचा तयार केला जाणार आहे.







