महेंद्र शिंदे

खेड शिवापूर, ता. १२: राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
गेल्या काही दिवसांतील घटना पाहता, एका व्यक्तीला लाकूड आणि दांडक्याने मारहाण करण्यात आली, तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या घटनेत एका व्यक्तीवर थेट कोयत्याने हल्ला करण्यात आला. श्रीरामनगर येथील पान टपरीवर ‘कोयता गँग’ने केलेला धुमाकूळही या गुन्हेगारी मालिकेचा भाग ठरला आहे. विशेष म्हणजे खेड शिवापूर पोलिस चौकी पासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला आहे. तर शनिवारी रात्री शिंदेवाडी येथे एका रिक्षाचालकावरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.
या सर्व घटनांनी नागरिकांत तीव्र असुरक्षिततेची भावना पसरली असून पोलिस प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. राजगड पोलिसांचा परिसरातील वचक कमी झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरीक आणि सामाजिक संघटनांकडून पोलिस प्रशासनाने तत्काळ कठोर कारवाई करावी आणि गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी राजगड पोलिसांनी वेळेवर कठोर पावलं उचलणं अत्यावश्यक आहे.







