पुणे : आंबेगाव तालुक्यातील डिंभे गावात एका स्थानिक हॉटेलमधून खरेदी केलेल्या लाडूमध्ये मानवी अंगठा आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, आदिवासी भागात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गोहे बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील रामचंद्र पोटकुले यांच्या कुटुंबीयांनी डिंभे येथील एका स्थानिक हॉटेलमधून लाडू खरेदी केले होते. लाडू घरी आणल्यानंतर जेवणात ते खाल्ले जात असताना अचानक लाडूमध्ये मानवी अंगठ्यासारखा भाग आढळून आला. हे दृश्य पाहून संपूर्ण कुटुंब हादरून गेले आणि ते तात्काळ लाडू बाजूला ठेवून हॉटेल व्यवस्थापनाकडे धावले. दरम्यान, या लाडूंपैकी काही लाडू आधीच खाल्ले गेले होते. त्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला, त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू असून, हॉटेलमध्ये लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनमध्ये कामगाराचा अंगठा अडकून तुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही ही केवळ एक शक्यता असून, याबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.
ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आदिवासी आणि ग्रामीण भागांतील अनेक छोट्या हॉटेल्समध्ये अस्वच्छतेचे आणि सुरक्षेचे निकष पाळले जात नसल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहेत. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, हॉटेल चालक आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडून लाडूंचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.








