पिंपरी : देहूरोड पोलिसांनी गांजाच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन कॉलेज तरुणाकडे २० लाखांची मागणी केली होती. पैकी जबरदस्तीने पाच लाख रुपये खंडणी उकळली होती. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह आठ जणांवर देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन, चार जणांना अटक केली आहे. तपासादरम्यान, पोलीस उपनिरीक्षक दोषी आढळल्याने तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षकावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.
सोहम धोत्रे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. धोत्रे हे देहूरोड पोलीस ठाण्यात तपास पथकात कार्यरत होते. किवळे येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला गांजाच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन त्याच्या वडिलांकडून पाच लाख रुपये खंडणी उकळली. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलीस नाईक हेमंत चंद्रकांत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन श्रीमंत शेजाळ यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.
हेमंत गायकवाड आणि सचिन शेजाळ या दोघांची देहूरोड पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. पोलिसांच्या तपास पथकात ते कार्यरत होते. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांचा वचक न राहिल्याने गायकवाड व शेजाळ यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल असे कृत्य केले. देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली.
देहू रोडच्या तपास पथकाकडून अवैध धंद्यांना आळा बसवणे गरजेचे होते. मात्र, गुन्हे शाखेने अवैध धंद्यावर कारवाई केली. या कारणामुळे पोलीस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.