पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे माजी पालकमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर पुणे जिल्ह्याच्या राजकीय व प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) पहिली बैठक आज पार पडली.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या बैठकीत सुनेत्रा पवार या मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाल्या. अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच ‘डीपीसी’ बैठक असल्याने राजकीय वर्तुळात तिचे विशेष महत्त्व मानले जात आहे. बैठकीस जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करून आवश्यक निधीची मागणी करण्याबाबत चर्चा झाली. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि जलसंधारण यांसारख्या प्रमुख विषयांवर प्राधान्यक्रम ठरविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, चंद्रकांत पाटील, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे हे ऑनलाइन सहभागी झाले होते. तसेच नीलम गोऱ्हे, दत्तात्रय भरणे, माधुरी मिसाळ तसेच आमदार सुनील शेळके, राहुल कुल आणि शंकर मांडेकर उपस्थित होते.
दरम्यान, आतापर्यंत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून अजित पवार हे स्वतः ‘डीपीसी’चा आराखडा मंजूर करत निधी वाटप करत असत. आता अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने आगामी काळात निधी वाटपाच्या धोरणात काय बदल होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना पूर्वीप्रमाणेच प्राधान्य मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या अनुपस्थितीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर जिल्ह्याच्या विकासाचा वेग कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील ही पहिली बैठक भविष्यातील धोरणात्मक दिशादर्शक ठरणार का, याबाबत उत्सुकता आहे.







