Daund : न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करून बॅंकेचे सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून पुन्हा घरात घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यात उघडकीस आला आहे. तब्बल 20 लाखांच्या कर्जप्रकरणातून हा वाद पेटला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी निखील संपत देवकाते (वय 30, रा. एमआयडीसी बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. तर अक्षय माधव काळे, पुष्पा माधव काळे आणि माधव फक्कड काळे (सर्व रा. गुणवरेवस्ती, खडकी, ता. दौंड) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सन 2024 मध्ये चोलामंडलम कंपनीकडून सुमारे 20 लाखांचे कर्ज घेतले होते. यासाठी त्यांनी सासवड शाखेकडील मिळकत क्रमांक 20ए मधील सुमारे 5 हजार चौरस फूट जागेवरील 3 हजार चौरस फूट आरसीसी बांधकाम असलेले घर तारण ठेवले होते. मात्र, कर्जाची परतफेड न झाल्याने थकीत रक्कम सुमारे 22.94 लाखांवर पोहोचली. याप्रकरणी कंपनीने न्यायालयात धाव घेतली असता पुणे येथील सीजीएम कोर्टाने 13 जानेवारी 2026 रोजी संबंधित मालमत्तेचा ताबा घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार 7 एप्रिल रोजी पोलीस बंदोबस्तात पंचासमक्ष घर सील करून कंपनीकडे ताबा हस्तांतरित करण्यात आला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 एप्रिल रोजी सकाळी फिर्यादी मालमत्तेची पाहणी करण्यासाठी गेले असता, सील तोडून आरोपी व त्यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा घरात प्रवेश करून ताबा घेतल्याचे आढळून आले. यावेळी विचारणा केली असता “ही आमचीच मालमत्ता आहे, तुम्ही पुन्हा येथे येऊ नका,” अशी धमकी देत फिर्यादीला परत पाठवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून न्यायालयीन आदेशाला जुमानले नसल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 329(2), 330, 331, 223,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पानसरे करत असून, संबंधितांवर कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







