लोणी काळभोर, ता. 29 : सुनेची सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे आमिष व पोलिसांकडून होणारी अटकेची कारवाई टाळण्यासाठी शेतकऱ्याकडून तोतया वकील महिलेने सुमारे 6 लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिलेकडे गुन्ह्यांच्या एफ.आय.आर. कॉपी, तक्रारी अर्ज, प्रॉपर्टीचे पेपर्स व काही संशयास्पद दस्त मिळुन आले आहेत. त्यामुळे अजून काही नागरिकांची फसवणूक झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर कोणाची अशा प्रकारची फसवणूक झाली असेल तर नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार द्यावी. असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.

स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय 32, रा. लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) या बोगस वकील महिलेला लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या गाळ्यात एका शेतकऱ्याकडून 15 हजार रुपये घेताना बुधवारी (ता.28) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले आहे. ही रक्कम स्विकारताना व पैसे मोजुन आणखी पैशांची मागणी करतानाचे व्हिडीओ शुटींग पोलिसांनी काढले आहे.

पुढे बोलताना पन्हाळे म्हणाले की, आरोपी स्नेहल कांबळेहिने फिर्यादी कडू सातपुते यांना कोर्टात त्यांची सुन सुरेखा यांच्यापासून सोडचिठ्ठी घेवून देण्याचे आमिष दाखविले. तसेच त्यांच्याविरुद्ध त्यांच्या सुनेने बलात्काराचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून याची तक्रार महिला आयोगाकडे केली आहे. अशी खोटी कारणे सांगितली आहेत. आरोपी महिलेने पोलीस व कोर्ट कर्मचारी यांना पैसे द्यावे लागतील, नाहीतर फिर्यादी कडू सातपुते यांना अटक होईल, अशी खोटी माहिती देवुन त्यांना वेळोवेळी अटकेची भिती दाखविली. व त्यांना ब्लॅक मेल करून वेळोवेळी ऑनलाईन व रोख स्वरुपात एकुण 5 लाख 94 हजार 60 रुपये रक्कम खंडणी स्वरुपात स्वीकारली आहे.
तोतया वकील स्नेहल कांबळे यांच्या घराची झडती घेतली असता, संशयास्पद पुरावे हाती लागले आहे. त्यामुळे सदर महिलेने अशाचप्रकारे वकील असल्याचे सांगुन अनेक नागरीकांची फसवणुक केली असल्याची दाट शक्यता निर्माण आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन आरोपी महिलेच्या विरोधात तक्रार द्यावी. पोलीस प्रशासन न्याय देण्यासाठी सक्षम असून कायम तुमच्या सोबतच आहे. कोणीही कसलाही संकोच बाळगू नये. असे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितले आहे.







