लोणी काळभोर, ता. 8: आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांचा आदर करणे आणि त्यांना मोक्ष प्राप्त करून देणे म्हणजे पितृपाठ होय. हिंदू धर्मामध्ये या विधीला अत्यंत महत्व आहे. या काळात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान यांसारखे विधी करून पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात, असे मानले जाते. पितरांसाठी देठाची भाजीदेखील केली जाते. परंतु, पूर्व हवेलीत नागरिकांनो तुम्ही आताच सावध व्हा. कारण परप्रांतीय महिला कचऱ्यातून नकली भाजी काढून विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याचा व्हिडीओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागला आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रामाकृषी रसायन ही कंपनी आहे. या कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत उगवलेले आहे तर कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. या ठिकाणी सोमवारी (ता.8) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दोन परप्रांतीय महिला शिरल्या. त्यांनी माठाच्या देठाच्या भाजीसारख्या दिसणाऱ्या भाज्या गोळा केल्या. देठाची भाजी असल्याचे भासविण्यासाठी त्यांनी भाजीची छाटणी केली. व पाला कचऱ्यात फेकून दिला आणि देठ गोळा करून विक्रीसाठी घेऊन गेल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ एका सजक नागरिकाने काढला आहे.

पितृपक्षात एका विशेष थाळीमध्ये विविध भाज्यांचा वापर केला जातो आणि त्यापैकी एक भाजी म्हणून देठाची भाजी तयार केली जाते. पितरांना नैवद्य दाखविल्यानंतर घरातील मंडळीदेखील जेवण करतात. मात्र जर ही नकली भाजी खाल्ली तर अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परप्रांतीय हे केवळ पैसे कमाविण्यासाठी आलेले आहेत. त्यांना तुमच्या आरोग्याचे काहीही घेणे देणे नाही. त्यामुळे परप्रांतीयांकडून कोणतीही वस्तू घेताना सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे.








