पुणे : आज (१४ जून) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात अजित पवार एका कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत कार्यक्रम मधेच थांबवण्याचा प्रयत्न केला. अजित पवार मंचावर भाषण देण्यासाठी आले तेव्हा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घोषणा सुरु केल्या. कर्जमाफी कुठे आहे?’, ‘शेतकरी अजूनही अडचणीत, बच्चू कडूंना न्याय द्या, अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.

प्रहार शेतकरी संघटनेचे नेते बच्चू कडू गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी तसेच वेगवेगळ्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. मात्र, सरकार कोणतीच भूमिका घेत नसल्याने अजित पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमात कार्यकर्ते आक्रमक झाले आणि गोंधळ करत कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी कार्यकर्ते ऐकत नसल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. स्वारगेट पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या व कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे. अजित पवारांच्या कार्यक्रम स्थळाबाहेर देखील शेतकरी आंदोलकांनी ठिया मांडला असून शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या अशी मागणी करत आहेत.

दरम्यान, यावेळी भाषण करताना अजित पवारांनी ‘आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता आहे.’ तसंच, ‘टोकाची भूमिका न घेता चर्चेतून मार्ग काढू.’, असं आश्वासन दिलं आहे.







