लोणी काळभोर, ता. 14 : तुम्ही प्राण्यांना पैसे देऊन विकत घेतले आहे. म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत कोणतेही गैरवर्तन करू शकता? असे समजत असाल तर तुमचा हा गोड गौरसमज आहे. त्यामुळे तुम्ही आताच सावध व्हा. नाहीतर तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो? कारण थेऊर (ता. हवेली) येथे रेड्याचा अमानुष छळ केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनकर लोंढे, हिरामण लोंढे (पूर्ण नाव व वय माहीत नाही, दोघे रा. थेऊर ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश केवलराव शिंदे (वय ३०, रा. यश हॉस्पीटलच्या समोर माळवाडी हडपसर पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश शिंदे हे हडपसर परिसरात राहतात. तर ते अनेक वर्षापासून गोरक्षक म्हणून काम करत आहेत. गणेश शिंदे व त्यांचा मित्र अथर्व सनस हे थेऊरमार्गे कोलवडीच्या दिशेने गुरुवारी (ता.12) साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चालले होते. तेव्हा गारुडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बनकर लोंढे व हिरामण लोंढे हे दोघेजण एका रेड्याला हाताने, लाथा बुक्याने व काठीने मारहाण करीत होते. त्यातील एक जण रेड्याच्या शेपटाला व्यास मुरगाळत होता. तर दुसरा रेड्याच्या शिंगाला धरुन जोरजोरात ओढत होता. त्यामुळे रेडा मोठ्याने ओरडत होता.

रेड्याच्या होणाऱ्या वेदना पाहून गणेश शिंदे व अथर्व सनस हे तेथे गेले. तुम्ही कशाला मारता त्याला प्रेमानी घेऊन जावा असे सांगितले. तेव्हा बनकर लोंढे व हिरामण लोंढे म्हणाले, हा रेडा आमचा आहे. आम्ही काहीही करू, तुम्हाला काय करायचे आहे, असे म्हणून रेड्यास सोबत घेऊन जाऊ लागले. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी त्या दोघांनाही तेथेच थांबविले. रेड्याला त्रास देणे गुन्हा आहे असे सांगितले. परंतु त्यांनी काहीही न ऐकता रेड्याला त्रास देणे सुरुच ठेवले.
त्यानंतर फिर्यादी यांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याची चाहूल लागताच, दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहे. पोलिसांनी 50 हजार रुपये किंमतीचा रेडा ताब्यात घेऊन गोशाळेत पाठविला आहे.
दरम्यान, बनकर लोंढे व हिरामण लोंढे या दोघांनी रेड्याला क्रूरपणे वागवणुक देऊन असह्य वेदना होतील अशाप्रकारे त्रास दिला आहे. अशी फिर्याद गणेश शिंदे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंध कायदा कलम ११(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत माने करीत आहेत.







