इम्रान अत्तार

भोर : पुणे जिल्ह्यातील भोर आगाराची एसटी बस महुडे मार्गावरील अरुंद चढावरून साईड देताना गटारात घसरून पलटी झाली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून, केवळ एका शाळकरी मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना सोमवार (८ जुलै) संध्याकाळी सहाच्या सुमारास महुडे खुर्द आणि महुडे बुद्रुक येथील खुडेवस्ती परिसरात घडली.
एमएच ०६ एस ८२८९ ही बस महुडे येथील शाळेतून सुटलेल्या सहा शाळकरी मुलींना घेऊन माळवाडीच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये चालक, वाहक आणि सहा मुली प्रवास करत होत्या. महुडे मार्गावरील विहिरीच्या चढावाजवळ अरुंद रस्त्यावर समोरून वाहन आल्यानंतर त्याला साईड देताना बसचा ताबा सुटून ती गटारात घसरून पलटी झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. एका मुलीला किरकोळ दुखापत झाल्याने तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून इतर पाच मुली, चालक आणि वाहक सुखरूप असल्याची माहिती आहे. मात्र बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर भोर आगाराचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीही पावसाळ्यात याच भागात अशाच प्रकारचा अपघात घडला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी शासनाकडे या रस्त्याचे तात्काळ रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे.







