Bhor Election: राज्यात महायुती एकत्र सत्तेत असली, तरी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये (Local Bodies Election) भाजप, अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत गेल्या काही दिवसांत धुसफूस निर्माण झाली आहे. तिन्ही पक्ष स्थानिक पातळीवर एकमेकांविरोधात थेट लढत आहेत, अनेक ठिकाणी नेते एकमेकांचे कार्यकर्ते आपल्याकडे घेत असल्याचं चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्ह्यात भोरमध्ये अजित पवारांनी शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच आपल्या पक्षात घेतल्याने नवा वाद पेटला आहे. (Pune Breaking News)

भोरमधली निवडणूक यावेळेस विशेष गाजत आहे. पूर्वी येथे भाजपची ताकद कमी होती. मात्र, माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये आल्यानंतर पक्षाचं वजन वाढलं आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक वर्षे थोपटे यांना सरळ आव्हान देत आपली उपस्थिती टिकवून ठेवली आहे. त्यामुळे भोर नगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट सामना होणार हे आधीच स्पष्ट झालं होतं. त्यातच शिवसेनेनेही काही ठिकाणी आक्रमक भूमिका घेत निवडणुकीला वेगळी रंगत आणली होती.
मात्र निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अर्ज दाखल करणारे नितीन सोनवले अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे शिवसेनेचा मुख्य उमेदवारच हातातून निघाला. सोनवले आपला शिवसेनेकडून भरलेला अर्ज मागे घेणार असून आता ते राष्ट्रवादीसाठी सक्रिय काम करणार आहेत. या घडामोडीमुळे भोरमधील शिवसेनेची समीकरणे बिघडली आहेत.
यामुळे भोरमधील लढत जवळजवळ द्विपक्षीय बनली आहे. संग्राम थोपटे यांच्या प्रभावामुळे भाजप मजबूत स्थितीत असताना, राष्ट्रवादीने सोनवले यांना घेऊन प्रतिकाराचा डाव आखल्याचे दिसते. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीतील दोन प्रमुख पक्षांची थेट टक्कर होणार आहे. भोरच्या लढतीतून महायुतीतील अंतर्गत स्पर्धा वाढली आहे, आता या संघर्षाचा पुढचा टप्पा कसा असेल याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.






