बापू मुळीक

सासवड: कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना मिळणारी बियाणे, औषधे आणि अवजारे ही निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. पुरंदरमधील शेतकऱ्याचे मुख्य साधन हे शेती आहे. परंतु, पाहिजे तेवढी शासनाची सामान्य शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. पुरंदरमध्ये कृषी खात्याने शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे. परंतु, ते होत नाही. जर शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल, तर ती दुर्दैवी बाब आहे. यासाठी आयुक्तालयासमोर आंदोलन करणार असल्याचे बाबाराजे जाधवराव यांनी सांगितले. सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे कृषी विभाग व आत्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जांभूळ व आंबा पीक परिसंवादात जाधवराव बोलत होते.
यावेळी जिल्हाप्रमुख दिलीप यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, कृषी संचालक सुनील बोरकर, माजी कृषी संचालक दिलीप झेंडे, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, प्रकल्प संचालक आत्मा सुरज मडके, उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, आंबा तज्ञ डॉ. भगवानराव कापसे, जांभूळ तज्ञ डॉ. एल. के. गबाले, तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, प्रदीप पोमण, शामकांत भिंताडे, विलास जगताप, श्रीरंग झेंडे, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहाय्यक, कर्मचारी, स्टाप व पुरंदरमधील शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.







