Ajit pawar : बारामती तालुक्यातील माळेगाव नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. हे विधान व्हायरल होताच राजकीय वादळ निर्माण झाले आणि विरोधकांनी याला मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न केले जात असल्याचे म्हटले. दरम्यान या विधानावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Ajit Pawar)

काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवार प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले होते, “तुम्ही मला १८ पैकी १८ उमेदवार निवडून द्या. मग तुमचं म्हणाल ते काम करून देईन. पण तुम्ही तिथे काट मारली, तर मीही काट मारणार. मत देणं तुमच्या हातात, आणि निधी देणं माझ्या हातात आहे—मग तुम्ही ठरवा काय करायचं.” त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे.
दरम्यान अजित पवार पुणे दौऱ्यावर आले होते. पुणे स्टेशनवरील शासकीय विश्रामगृहात पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांच्याच अध्यक्षतेखाली झाली. बैठक संपल्यानंतर पत्रकारांनी माळेगावमधील त्यांच्या विधानाबद्दल विचारलं.
यावर अजित पवार म्हणाले
“निवडणुकांच्या वेळी आश्वासनं द्यावी लागतात. बिहारमध्ये राजदचे तेजस्वी यादव यांनीही ‘आम्हाला निवडून दिल्यास निधी वाढवू’ असं म्हटलं होतं.”







