पुणे : पाषाण-सूस रस्त्यावर चालत्या मोटारीवर पाठीमागून भरधाव वेगाने आलेली मोटार आदळल्याने झालेल्या अपघातात मोटारचालक संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मोटारचालक संगणक अभियंता तरुणीचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कीर्ती कृष्णा माळवे (वय ४०, रा. इस्टीका सोसायटी, बाणेर) असे मृत्युमुखी पडलेल्या संगणक अभियंता तरुणीचे नाव आहे. अपघातात मोटारचालक अभिक चॅटर्जी (वय २४, रा. पाषाण-सूस रस्ता) जखमी झाले आहेत.
या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्ती माळवे एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला होत्या. तर चॅटर्जी एका व्यायामशाळेत प्रशिक्षक आहेत. मोटारचालक कीर्ती रात्री नऊच्या सुमारास पाषाण-सूस रस्त्याने निघाल्या होत्या. वरदायिनी सोसायटीसमोर कीर्ती यांचे नियंत्रण सुटले. त्याचवेळी तेथून मोटारचालक चॅटर्जी निघाले होते. चॅटर्जी यांच्या मोटारीवर पाठीमागून भरधाव मोटार आदळली.
या अपघातात मोटारचालक कीर्ती तसेच मोटारचालक चॅटर्जी जखमी झाले. गंभीर जखमी अवस्थेतील कीर्ती यांना खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करत आहेत.