पुणे: पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कोरेगाव येथे घडलेला भीषण अपघात संपूर्ण परिसराला हादरवून गेला. एका भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या दोन लहान मुलांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, शिरूर पोलिसांकडून टेम्पोचालकाचा शोध सुरू आहे.

मृत महिलेचे नाव आरती सावंत असे असून, तिची दोन चिमुकली मुलं स्वराज आणि स्वराली या अपघातात गंभीर जखमी झाली आहेत. आरती सावंत आपल्या दोन्ही मुलांसह दुचाकीवरून शिरूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.अपघात इतका भीषण होता की, टेम्पोची धडक लागताच आरती सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत असलेली दोन मुले काही अंतरावर फेकल्या गेली. घटनास्थळावर उपस्थित स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि जखमी मुलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन निष्पाप चिमुकल्यांसमोरच त्यांच्या आईचा मृत्यू झाल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, अशा भीषण घटनांना टाळण्यासाठी अधिक जबाबदारीने वाहन चालवण्याचे आवर्जून सांगण्यात आले आहे.







