पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खासगी ट्युशनमध्ये ३५ वर्षीय शिक्षिकेने १० वर्षाच्या मुलाला बेल्ट आणि वह्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीये. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल केलाय.

ही घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली. शिक्षिका आणि मुलगा एकाच परिसरात राहायला आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने गृहपाठ केला नव्हता. आणि याच रागात शिक्षिकेने त्या मुलाला बेल्ट आणि वह्यांनी मारले. यात मुलाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या पालकांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी शिक्षिकेवर बालकांवरील अत्याचारासंबंधी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात असून, मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे ट्युशन क्लासेसच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षिकेला ताब्यात घेतले असून, तिच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. स्थानिक नागरिकांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक नियमांची मागणी केली आहे







