पुणे: महाराष्ट्रात गेल्या सुमारे पावणेचार वर्षांपासून सुरू असलेल्या ‘प्रशासक राज’ ला अखेर पूर्णविराम लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आता महाराष्ट्रातील 32 जिल्हा परिषदा (झेडपी) (ZP Elections)आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यामुळे, राज्यात लवकरच निवडणुकांचा बिगूल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मंगळवार (23 सप्टेंबर) रोजी, राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांच्या मतदार यादीचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
निवडणुकीसाठीची प्रक्रिया आणि तारखा:

- 8 ऑक्टोबर 2025: जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
- 8 ते 14 ऑक्टोबर 2025: या प्रारुप यादीवर राजकीय पक्ष आणि गाव पुढाऱ्यांकडून हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील.
- 27 ऑक्टोबर 2025: हरकती आणि सूचनांचे निराकरण झाल्यानंतर मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण
सर्वसाधारण (खुला प्रवर्ग)
- रायगड
- सिंधुदुर्ग
- नाशिक
- जळगाव
- पुणे
- बुलढाणा
- यवतमाळ
- छत्रपती संभाजीनगर
सर्वसाधारण (महिला)
- ठाणे
- सांगली
- कोल्हापूर
- लातूर
- अमरावती
- गोंदिया
- गडचिरोली
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)
- सोलापूर
- नागपूर
- भंडारा
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला
- रत्नागिरी
- धुळे
- सातारा
- जालना
- नांदेड
- धाराशिव
अनुसूचित जाती (SC)
- हिंगोली
- परभणी
- वर्धा
अनुसूचित जाती (SC) – महिला
- बीड
- चंद्रपूर
अनुसूचित जमाती (ST)
- पालघर
- नंदुरबार
अनुसूचित जमाती (ST) – महिला
-
- अहिल्यानगर
- अकोला
- वाशिम
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 29 महापालिकांच्या निवडणुकांना मुदतवाढ मिळाली असतानाच, झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आधी होतील, हे स्पष्ट झाले होते. तसेच, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या गट आणि गणांच्या आरक्षणाबाबतच्या आव्हान याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळल्या होत्या, ज्यामुळे निवडणुकांचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
अनेक वर्षांपासून निवडणुका प्रलंबित
महाराष्ट्रातील 26 जिल्हा परिषदा आणि 286 पंचायत समित्यांचा कार्यकाल 20 मार्च आणि 13 मार्च 2022 रोजीच संपला होता. तेव्हापासून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नेमण्यात आले होते. त्यानंतर आणखी 6 जिल्हा परिषदा आणि 50 पंचायत समित्यांचा कार्यकालही संपलेला आहे. या सर्व ठिकाणी लवकरच लोकनियुक्त प्रतिनिधी काम करताना दिसतील, अशी आशा आहे.







