मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना, शिंदे गटाचे आमदार कृपाळ तुमाने यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दसऱ्यानंतर राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार असून, त्याचा थेट परिणाम राज्यातील राजकारणावर होणार आहे.

या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तुमाने यांनी म्हटले आहे की, ठाकरे गटाचे सध्याचे 20 पैकी 18 आमदार संजय राऊत यांच्यावर नाराज आहेत आणि ते लवकरच शिंदे गटात सामील होतील. निवडणुकीच्या तोंडावर हा दावा समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इतके दिवस जे आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले, ते खरोखरच आता साथ सोडणार का, की निवडणुकांमध्ये ते ठाकरे गटासोबतचं राहणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, संजय राऊत यांनी या दाव्यावर लगेचच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी टीका करताना म्हटले की, “जे लोक पैसा, दहशत आणि ईडीच्या दबावाखाली शरण गेले, त्यांना निष्ठेबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही.”
खरं तर, 2022 च्या विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत फूट पडली होती. त्यावेळी अनेक आमदार आणि खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात प्रवेश केला होता, ज्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार कृपाळ तुमाने यांच्या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात आणखी काय घडामोडी होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.







