Solapur : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांची धामधूम संपताच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार रंगात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर चित्र स्पष्ट झालं असून, या निवडणुकांमध्येही “घराणेशाही” ठळकपणे समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात अनेक प्रस्थापित नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना थेट निवडणूक रिंगणात उतरवल्याचं दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पुढची राजकीय पिढी तयार करण्याचा हा प्रयत्न असल्याचं राजकीय जाणकार मानतात. (Solapur)

माळशिरस तालुक्यात तर घराणेशाहीचा प्रभाव अधिक ठळक आहे. शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि वहिनी वैष्णवी देवी मोहिते पाटील निवडणूक लढवत आहेत. त्याच तालुक्यातील शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनीही आपले पुत्र जीवन जानकर आणि कन्या ज्योती जानकर यांना मैदानात उतरवलं आहे. याच माळशिरसमधून भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते दहिगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत.

सांगोला तालुक्यात माजी विधान परिषद आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे पुत्र यशराज साळुंखे पाटील जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मंगळवेढ्यात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या कोमल या लक्ष्मी दहिवडी गटातून शरद पवार गटाकडून उमेदवार आहेत.
करमाळा तालुक्यात दिवंगत माजी आमदार दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी बागल कोलते भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते कल्याणराव काळे यांच्या वहिनी मोनिका काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून वाखरी गटातून उमेदवारी दाखल केली आहे. तर दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुतणे व्यंकटराव भालके गोपाळपूर गटातून मैदानात आहेत.
मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील स्वतः कुरुल गटातून उमेदवार असून, त्यांचे बंधू संतोष पाटील नरखेड गटातून निवडणूक लढवत आहेत.
या सगळ्या घडामोडींमुळे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केवळ विकासाच्या मुद्द्यांपुरत्या न राहता, राजकीय वारसदारांची चाचणी ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मतदार या घराणेशाहीला कितपत स्वीकारतात, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.







