Maharastra Election : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला असतानाच प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. पण त्याचवेळी न्यायालयीन प्रकरणं, तांत्रिक चुका आणि उमेदवारांवरील अपील यामुळे साधारण 20 जिल्ह्यांतील काही नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, नांदेड, धाराशिव अशा अनेक जिल्ह्यांमध्ये काही प्रभागांमध्ये मतदान हुलकावणी देत आहे. तरी बाकीच्या ठिकाणी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. Maharastra Election

सोलापूरच्या मंगळवेढा नगरपालिका निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे ढकलल्या असून आता 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. यवतमाळमध्ये काही प्रभागांतील तांत्रिक चुका आणि कोर्टातील प्रकरणांमुळे तिथेही निवडणुका 20 डिसेंबरला होतील. अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या नगरपरिषदांच्या निवडणुका नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या अपीलमुळे पुढे गेल्यात. धाराशिवमध्ये तीन प्रभागांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून मतदान 20 डिसेंबरला होणार आहे. चंद्रपूर, अकोला, नांदेड या जिल्ह्यांमध्येही याच कारणांमुळे काही नगरपरिषदा आणि प्रभागांमध्ये निवडणुका थांबल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील तळेगाव आणि लोणावळा नगरपरिषदांमधील 12 जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली असून आता या जागांवर 29 डिसेंबरला मतदान होणार आहे. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचे बंधू सुदाम शेळके यांच्या प्रभागाची निवडणूकही पुढे ढकलली गेली. बारामती नगराध्यक्ष निवडणूक आणि काही प्रभागांतील मतदानही आता 20 डिसेंबरला होणार आहे. अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेची निवडणूकही कोर्टनिर्णयांमुळे थांबली असून येथेही 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणुका पुढे ढकलल्याने अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला असला तरी सुधारित कार्यक्रमानुसार प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे.







