Nagar Parishad Election : राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा माहोल रंगात आला असतानाच मोठा घोळ निर्माण झाला आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच न्यायालयीन प्रकरणं, तांत्रिक चुका आणि उमेदवारांवरील अपील यामुळे तब्बल 20 जिल्ह्यांतील अनेक नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, नांदेड, धाराशिव अशा जिल्ह्यांमध्ये काही प्रभागांमध्ये मतदानाला थांबण्यात आलं आहे. मात्र बाकीच्या भागात 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल होणार आहे.

पुणे जिल्ह्यात नगरपरिषदांमधील 12 जागांची निवडणूक स्थगित
पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील तळेगाव आणि लोणावळा नगरपरिषदांमधील 12 जागांची निवडणूक स्थगित झाली आहे. या जागांवर आता 29 डिसेंबरला मतदान होणार असून हा बदल न्यायालयीन प्रलंबित अपीलांमुळे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. (Nagar Parishad Election )
फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेचा समावेश
याच वेळापत्रकाचा फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीलाही लागू होणार आहे. येथेही 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची खात्री झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर कार्यक्रम 4 डिसेंबरला येणार आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवार आणि पक्षांनी आता नव्या तारखांनुसार पुन्हा रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबरला जारी केलेल्या आदेशानुसार ज्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका कोर्टकेस किंवा तांत्रिक कारणांमुळे अडकल्या आहेत, त्यांच्यासाठी नवा सुधारित कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून हा कार्यक्रम 4 डिसेंबरला प्रसिद्ध होईल. नामनिर्देशन मागे घेण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर, तर अंतिम उमेदवार यादी 11 डिसेंबरला जाहीर होणार आहे. आवश्यक असल्यास मतदान 20 डिसेंबरला आणि मतमोजणी 21 डिसेंबरला होईल. निकाल 23 डिसेंबरपर्यंत राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.
Nagar Parishad Election







