Indapur News | इंदापूर : इंदापूर ( Indapur News )शहरात राष्ट्रवादीच्या बॅनरवर चक्क पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांचा फोटो झळकला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. कायम एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांच्या या एकत्रीत बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर शहरात राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवार, सुप्रिया सुळे, आणि अजित पवार या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या सोबतीला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावल्याचे दिसत आहे. वास्तविक इंदापूर शहराला विकास कामांसाठी निधी दिल्याने बॅनरवर चंद्रकांत पाटील यांचे फोटो लावत राष्ट्रवादीकडून आभार मानले आहेत.
शुभेच्छूक म्हणून राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी…
या बॅनरवर माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या प्रयत्नातून हा निधी आल्याचा उल्लेख केला आहे. तसेच धन्यवाद चंद्रकांत दादा अशा आशयाचे बॅनर इंदापूरच्या चौकाचौकात लागले आहेत. शुभेच्छूक म्हणून राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या बॅनरची सध्या सोशल मीडियासह कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही प्रमुख पक्ष आहेत. नंबर वनसाठी दोन्ही पक्षांचे प्रयत्न आहेत. यामुळे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याची आणि पक्षाची प्रसिद्धी करत असतो. परंतु इंदापूरमध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यांबरोबर चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावला गेला आहे. यामुळे खमंग राजकीय चर्चा रंगली आहे. या बॅनरवरती राजकीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया अद्याप आली नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Good News : पुणे ते मुंबई थेट विमानसेवा होणार सुरु ; एअर इंडियाचा निर्णय