Eknath Shinde On Nilesh Rane : कोकणात सध्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये येऊन शिवसेना आमदार निलेश राणे यांचं तोंडभरून कौतुक केलं, तेही अगदी खास अंदाजात! शिंदे साहेबांना मी सोडलं तर देव मला माफ करणार नाही, असं निलेश राणे म्हणाले होते. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी “कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा, पण शिवसेनेला कोकणात सापडला आहे ‘हिरा’,” असं म्हणत शिंदेंनी निलेश राणे यांना थेट ‘हिऱ्या’ची उपमा दिली. यापूर्वी, निलेश राणे यांनी ‘शिंदे साहेबांना मी सोडलं तर देव मला माफ करणार नाही,’ असं भावनिक विधान केलं होतं. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, “माझ्या पोटात एक आणि ओठात दुसरं असं कधीच नसतं. जो काम करतो, मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एकनाथ शिंदे आहे.” (Eknath Shinde On Nilesh Rane)

“इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणे करणार!”
दरम्यान शिंदे यांनी यावेळी निलेश राणेंचं धैर्य आणि कामाची धडाडी याचंही कौतुक केलं. ते म्हणाले, “निलेश राणे कधी घाबरत नाही. नारायण राणे यांचं बाळकडू त्याला मिळालं आहे.” तसेच, ‘मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन केली आहेत,’ असं सूचक विधानही त्यांनी केलं. कोकणी माणसाचं वर्णन करताना ते म्हणाले की, कोकणी माणूस फणसासारखा बाहेरून काटेरी, पण आतून गोड असतो. त्यामुळेच कोकण ही शिवसेनेची कर्मभूमी आहे. त्यांनी ठामपणे सांगितलं, “इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार! कुणी कितीही कल्ला केला, तरी मालवण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला राहील.” (Eknath Shinde On Nilesh Rane)
‘लाडकी बहीण’ योजना आणि मालवणच्या विकासाचं आश्वासन
यावेळी त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी, म्हणजेच उमेदवार ममता वराडकर यांच्यासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, “मी माझ्या लाडक्या बहिणीसाठी आणि भावांसाठी रक्ताचा थेंब असेपर्यंत काम करेन. दोन तारखेला धनुष्यबाणाचं बटण दाबून मालवणवर भगवा फडकवा.” त्यांनी त्यांच्या कार्यकाळात आणलेल्या योजनांपैकी ‘लाडकी बहीण’ योजना ही त्यांची सर्वात आवडती योजना असल्याचंही सांगितलं. शेवटी त्यांनी निलेश राणे यांना थेट आव्हान दिलं की, “तुम्ही मालवणच्या विकासाचा प्रस्ताव द्या, आपण मालवणचा कायापालट करून टाकू!”







