पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या (ZP Election) निवडणुकांसाठी आज 12 जिल्ह्यांत मतदान पार पडत आहे. वास्तविक, हे मतदान 5 फेब्रुवारी रोजी नियोजित होते. मात्र दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेली शोककळा आणि कायदा-सुव्यवस्थेचा विचार करून निवडणूक आयोगाने हा निर्णय 2 दिवस पुढे ढकलला होता. आज सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या असून, ग्रामीण भागातील सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील एकूण 12 प्रमुख जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि तब्बल 125 पंचायत समित्यांसाठी हे मतदान होत आहे. यामध्ये राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या पट्ट्यांचा समावेश आहे:
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर.
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर आणि बीड.
कोकण: सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी.
अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा कोणाला मिळणार की सत्ताधारी पक्ष आपली पकड मजबूत करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकणार ते महत्वाचे ठरणार आहे. 12 जिल्ह्यांतील 731 जिल्हा परिषद आणि 1,462 पंचायत समिती जागांसाठी आज सुमारे 2 कोटी मतदार कौल देतील.






