Pune ZP Election: पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यात आज होणाऱ्या जिल्हा परिषद (ZP Election) आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (District Collector Jitendra Dudi) यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. ज्या मतदारांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मतदान केले आहे, त्यांनी आज पुन्हा मतदान करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. नोकरी किंवा व्यवसायासाठी पुण्यात वास्तव्यास असलेल्या अनेक नागरिकांची मतदारयादीत दुबार नोंद आहे. अशा मतदारांनी शहरात मतदान केले असल्यास गावी जाऊन पुन्हा मतदान करणे टाळावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आज, शनिवारी संबंधित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदारसंघातील मतदार जर कामानिमित्त इतर ठिकाणी असतील, तरी त्यांनाही ही सुट्टी लागू राहणार आहे. केंद्र व राज्य सरकारची कार्यालये, निम्नशासकीय कार्यालये तसेच बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी द्यावी, तसेच पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान तीन तासांची मतदानासाठी सवलत द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
आज होणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 146 गणांसाठी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असून, मतदान सुरू होण्यापूर्वी एक तास आधी मॉकपोल घेतला जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतदान केंद्रांवर 23 हजार 114 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान जिल्हा प्रशासनाकडे 22 आणि राज्य निवडणूक आयोगाकडे 1 अशी एकूण 23 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.






