तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून दोन्ही देशांमधील संघर्षाने गंभीर वळण घेतले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही देशांमध्ये शांतता कराराबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत असतानाच अमेरिकेने इराणवर लष्करी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

वृत्तानुसार, मंगळवारी पहाटे अमेरिकेच्या सैन्याने इराणमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या केशम बेटावर हल्ला केला. या बेटाला लक्ष्य केल्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधीही अमेरिका इराणविरोधात मर्यादित स्वरूपात लष्करी कारवाया करत असल्याची चर्चा होती. मात्र, ताज्या हल्ल्यामुळे अमेरिकेच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर इराणसोबत करार होण्याची शक्यता व्यक्त केली होती. इराण चर्चेद्वारे तोडगा काढण्यास इच्छुक असल्याचा दावाही त्यांनी केला होता. या विधानानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल सुमारे 10 डॉलरची घसरण झाल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनीही कराराबाबत सकारात्मक संकेत दिले होते. इराणसोबत काही सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले होते. यासंदर्भात ट्रम्प यांच्याशीही चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या लष्करी कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. इस्रायलकडूनही इराणविरोधात कठोर भूमिका घेण्यासाठी अमेरिकेवर दबाव असल्याची चर्चा आहे. आता या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील शांतता चर्चा पुढे जाणार की संघर्ष आणखी वाढणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.







