मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत यांच्या नावाने सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये कंगना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भारताच्या शिक्षणमंत्री पदाची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, पडताळणीत हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे समोर आले आहे.

व्हायरल पोस्टमध्ये कंगना यांच्या नावाने लिहिले आहे की, त्यांनी नरेंद्र मोदी यांना विनंती केली असून त्यांना देशाच्या शिक्षणमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी. शिक्षणाचे महत्त्व आपल्याला माहिती असल्याचे सांगत, भारताला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले हे सांगणारी आपण पहिली व्यक्ती असल्याचा विचित्र दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

याशिवाय, या बनावट पोस्टमध्ये कंगना यांच्याकडे NEET परीक्षेसाठी योजना असल्याचेही म्हटले आहे. तसेच, जो विद्यार्थी त्यांचा चित्रपट थिएटरमध्ये पाहील, त्याला NEET परीक्षेत अतिरिक्त गुण मिळतील, असा उपहासात्मक मजकूरही या पोस्टमध्ये जोडण्यात आला आहे.

ही पोस्ट खरी आहे का, याची तपासणी करण्यात आली. त्यासाठी कंगना राणावत यांचे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट तपासण्यात आले. मात्र, अशा प्रकारची कोणतीही पोस्ट किंवा शिक्षणमंत्री होण्याबाबतची मागणी त्यांच्या कोणत्याही अकाउंटवर आढळून आली नाही. कंगना अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी जनरेशन झेड म्हणजेच Gen Z बद्दल केलेल्या वक्तव्यावरूनही त्यांच्यावर टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने चुकीच्या आणि बनावट पोस्ट पसरवल्या जात असल्याचे दिसत आहे.






