बिहार: बिहारच्या जामुई जिल्ह्यातील छेदाही गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पती दिल्लीमध्ये मजुरी करत असताना, त्याच्या अनुपस्थितीत त्याची पत्नी आणि मित्र यांच्यातील संबंध गावकऱ्यांना संशयास्पद वाटले. परिणामी, गावकऱ्यांनी त्या महिलेला पतीच्या मित्रासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
मालती देवी, ही सहा मुलांची आई आहे, गावात एकटी राहत होती. तिचा पती रोहित तांती हा दिल्लीमध्ये मजुरी करत होता. गावात परतलेला त्याचा मित्र राहुल शर्मा मालतीला वेळोवेळी मदतीसाठी भेटत असे. रोहितनेच राहुलला जमिनीसंबंधीच्या कागदपत्रांच्या कामासाठी आपल्या पत्नीकडे पाठवलं होतं.
मात्र, गावकऱ्यांनी या भेटीगाठींना प्रेमसंबंधाचं स्वरूप दिलं. संशय इतका वाढला की, राहुल शर्मावर काठ्या आणि रॉडने मारहाण केली आणि नंतर दोघांचं जबरदस्तीने लग्न लावलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात राहुल शर्माची होत असलेली मारहाण स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान, राहुल शर्माने स्पष्ट केलं की, त्याने रोहित तांतीच्या सांगण्यानुसार मालतीला मदत केली. त्यांच्यात कोणतेही प्रेमसंबंध नव्हते. मात्र गावकऱ्यांच्या गैरसमजुतीमुळे ही गंभीर परिस्थिती ओढावली. राहुलची पत्नी, करीना शर्मा हिने या जबरदस्तीच्या विवाहास नकार दिला असून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.







