तेहरान: पश्चिम आशिया सध्या लष्करी हालचाली आणि राजकीय (US-Iran War) डावपेचांनी तापले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील इस्लामाबाद येथील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता हा युद्ध संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे शांततेसाठी पावले उचलली जात असतानाच, अमेरिकेने इराणची आर्थिक नाडी आवळण्यासाठी ‘होर्मुझ सामुद्रधुनी’त केलेली नाकेबंदी या संघर्षाला नव्या वळणावर घेऊन गेली आहे.

युद्धाच्या या धुमश्चक्रीत इराणने एक अनपेक्षित खेळी खेळली आहे. सौदी अरेबिया, यूएई, कतार, बहरैन आणि जॉर्डन या पाच देशांकडे इराणने ‘नुकसान भरपाई’ मागितली आहे. या देशांनी अमेरिकेला साथ दिल्याचा आरोप इराणने केला असून, शांतता प्रक्रियेसाठी ही नवीन अट पुढे केली आहे. दुसरीकडे, अमेरिकेने इराणची तेल आणि पोलाद निर्यात रोखण्यासाठी 15 युद्धनौका तैनात केल्या आहेत. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकण्याची भीती निर्माण झाली आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक व्यापाराचा मुख्य मार्ग आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे भारत, चीन आणि पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो. भारताची मोठी तेल आयात याच मार्गाने होते.
आज अमेरिकेत इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे. रशिया आणि इराणमध्येही पडद्यामागे चर्चा सुरू असली तरी, ठोस तोडगा अद्याप निघालेला नाही. मात्र शांतीवार्तेला हिजबुल्ला या संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. दरम्यान, पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







