चीन: चीनमधील बीजिंग येथे झालेल्या प्रसिद्ध ‘Hyrox’ इनडोअर फिटनेस स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडू जोआना विएत्रझिकसोबत अनपेक्षित घटना घडली. स्पर्धेदरम्यान तिची प्रकृती अचानक बिघडली आणि तिच्या नकळत कपड्यांमध्येच मलविसर्जन झाले. विशेष म्हणजे, या परिस्थितीतही तिने शर्यत मध्येच सोडली नाही आणि ती पूर्ण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली.

घटनेनंतर जोआनाने सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकाराबद्दल माफी मागितली. प्रकृती बिघडल्यानंतर आपण स्पर्धेतून माघार घ्यायला हवी होती, असे तिने मान्य केले. तसेच बीजिंगमधील नागरिक, सहभागी खेळाडू, प्रेक्षक आणि आयोजकांना झालेल्या त्रासाबद्दल तिने दिलगिरी व्यक्त केली. टीकेनंतर तिने स्पर्धेत मिळालेले विजेतेपद सोडण्याची तयारीही दर्शवली आहे.

या घटनेनंतर Hyroxच्या आयोजकांवरही प्रश्न उपस्थित झाले. खेळाडूची प्रकृती स्पष्टपणे बिघडलेली असताना तिला वेळेत थांबवण्यात आले का, असा मुद्दा चर्चेत आला. Hyroxचे सहसंस्थापक मोरित्झ फ्यूर्स्टे यांनी या प्रकरणाबद्दल माफी मागितली. भविष्यात जैविक अस्वच्छता आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियम अधिक स्पष्ट करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, तीव्र व्यायामाच्या वेळी काही खेळाडूंना अचानक पोटाच्या समस्या जाणवू शकतात. याला ‘रनर डायरिया’ असे संबोधले जाते. अतितीव्र व्यायाम, शरीरातील बदल, खाण्यापिण्याच्या वेळा किंवा हायड्रेशनमधील चूक यामुळे पोटात अस्वस्थता निर्माण होऊ शकते.







